एकनाथ खडसेंचा 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश?


मुंबई: भाजपवर गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. खडसे कालच पवारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

एकांतवासात गेल्या काही दिवसांपासून असलेले एकनाथ खडसे मुंबईत कालच आले आहेत. आज शरद पवारांना ते भेटणार असून दोन दिवसांत राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितल्यामुळे राष्ट्रवादीत खडसे जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. महाराष्ट्रातून त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. पण खडसेंना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून खडसे अस्वस्थ होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता.

अशातच शरद पवार यांनी पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत गेल्या आठवड्यात एक बैठक केली होती. खडसेंच्या प्रवेशावर या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात होत. त्यानंतर आता खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा उत्तर महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना असल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. पण खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले होते.