हाथरस प्रकरणावरुन आणखी एका भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य


नवी दिल्ली – देशभरात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या घटनेचे पडसाद उमटत असून लोक पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करत असताना या प्रकरणात मुलीचीच चुक असल्याचे सांगत आणखी एका भाजप नेत्याने मुक्ताफळे उधळली आहेत. हाथरस प्रकरणातील आरोपी निर्दोष असून पीडित मुलगीच वाईट वळणाची असल्याचे वक्तव्य भाजप नेत्याने केले आहे. त्याचबरोबर अशा मुली नेहमी मृतावस्थेतच सापडतात, असे धक्कादायक वक्तव्यही या नेत्याने केले आहे.

हाथरस प्रकरणावर बोलताना उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यातील भाजपचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात श्रीवास्तव यांनी मुलीचे आरोपीशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीवास्तव यांनी हाथरस पीडितेबरोबरच बलात्कारांच्या घटनांमध्ये मरण पावलेल्या पीडितांविषयीही संतापजनक व्यक्तव्य केले आहे. त्यावरून आता श्रीवास्तव यांच्यावर टीका केली जात आहे.


मुलाला बाजरीच्या शेतात मुलीने बोलावले असेल, कारण प्रेमप्रसंग होता. सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरही ही गोष्ट आली आहे. मुलीला पकडले गेले असेल. शेतामध्ये असेच होते. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदळाच्या शेतात का सापडत नाहीत? या गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? यांची मरण्याची जागा तीच आहे. कुठेही ओढून नेल्या जात नाहीत. यांना ओढून नेताना कुणी पाहत नाही. मग या घटना यांच्या सोबत का घडतात? हे देशपातळीवर माहिती आहे, मी काहीही चुकीचे बोललो नाही. पण मुले दोषी नाही, मुलगी दोषी आहे, असे वादग्रस्त भाष्य श्रीवास्तव यांनी केले आहे.

ही मुले निर्दोष असून, त्यांना वेळेत सोडले गेले नाही, तर मानसिक त्रासाला सामोर जावे लागेल. त्याचे गेलेले वय कोण परत करणार आहे? त्यांना नुकसानभरपाई सरकार देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, अशी मागणीही श्रीवास्तव यांनी केली आहे.