दाढीवाल्या पुरुषांना मास्क आणू शकतो अडचणीत

सध्या करोनापासून संरक्षणासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक बनले असले तरी ज्या पुरुषांनी दाढी वाढविली आहे त्यांना मास्कमुळे अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या लोकांनी मास्क वापरताना विशेष काळजी घेतली नाही तर मास्क त्यांना नुकसान पोहोचवू शकतो असा इशारा दिला गेला आहे.

दाढी वाढविलेल्या लोकानी सतत मास्क लावला तर त्वचेला खाज सुटणे, जळजळ होणे, लाल चट्टे उठणे अश्या तक्रारी होऊ शकतात. दाढी ओली राहिली तर वरून मास्क असल्याने आता जीवाणूंची वाढ होऊ शकते. दाढीतील आर्द्रतेमुळे खाज, कोंडा निर्माण होण्याची समस्या येऊ शकते.

दाढी मोठी असेल तर मास्क चेहऱ्यावर घट्ट बसत नाही. परिणामी नाक तोंड येथे फट राहते त्यामुळे विषाणू आत जाऊ नयेत यासाठी पुरेसे संरक्षण मिळत नाही. त्यातून जे पुरुष मॉइस्चरायझरचा ही वापर करतात त्यांना आणखी समस्या येऊ शकते. त्यामुळे मास्क काढल्यावर आणि घालण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आणि दाढी पूर्ण कोरडी करणे याची खबरदारी घेतली गेली पाहिजे असा सल्ला दिला गेला आहे.