कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही -उदय सामंत


पुणे – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटमुळे या रोगाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनेक महत्वपूर्ण पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मागील सात महिन्यांपासून महाविद्यालय बंद असून कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत पूर्णपणे निवळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उदय सामंत यावेळी म्हणाले की, राज्यातील अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफ़लाईन घेतल्या जाणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे त्यामध्ये नुकसान होणार नाही. याबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे. ऑफ़लाईन परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थ्याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आता राज्यातील ग्रंथालय देखील लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ४ मे रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेला शासकीय पदभरती बंदीचा निर्णय प्राध्यापक भरतीसाठी स्थगित केला जाणार आहे. राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा देखील झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.