तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा


पाटना – राष्ट्रीय जनता दलास (राजद) बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या अगोदर आणखी एक मोठा झटका बसला असून बिहार पोलिसांनी रविवारी राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याचा आरोप करून, मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्तास पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.

रविवारी सकाळी हल्लेखोरांनी राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांची घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबियाचा आरोप आहे की ही लोक शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी देत होते.