अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’चा टीझर रिलीज


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारने देशभक्तीपर चित्रपटांद्वारे आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमार कोरोना काळातही वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त होता. याच काळात त्याने आपल्या आगामी चित्रपट ‘बेलबॉटम’चे देखील चित्रीकरण पूर्ण केले. आज या चित्रपटाचा टीझर अक्षय कुमारने प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.


अक्षय कुमारने सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. केवळ अक्षय कुमारचा लूक या चित्रपटाच्या टीझरमध्ये रिव्हील करण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच एका लो-अँगल कॅमेरा शॉटमध्ये अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’वर फोकस करण्यात आला आहे. ७०च्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या ‘बेलबॉटम’ पँटवरूनच या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

विमान अपहरणात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचा थरार ‘बेलबॉटम’ या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचे कळते आहे. पण टीझरमध्ये याची कोणतीही झलक चित्रपटाच्या निर्मात्यांनी लीक केलेली नाही. टीझर सुरू होताच थोड्या वेळाने, सूट बूट घातलेल्या अक्षय कुमारची एंट्री होते. त्यानंतर अचानक इंडियन एअरलाइन्सच्या विमानासमोर कामगाराचा गणवेश घातलेला अक्षय दिसतो. तर, पुढच्या फ्रेममध्ये तो एका टँकरवर लटकताना दिसतो आहे. या टीझरमध्ये एकाही संवाद नाही. पण पार्श्वसंगीताद्वारे एक वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु टीझरचे व्हिज्युअल जितके प्रभावी वाटतात, तितके पार्श्वसंगीत बनावट वाटते आहे.