आता तरी आमच्या पोलिसांवर टीका करणारे “मराठी भैय्ये” माफी मागणार का? – जितेंद्र आव्हाड


मुंबई – दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानाच्या (एम्स) डॉक्टरांच्या एका पॅनेलने अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आपला अहवाल सीबीआयला मत देताना सुशांत सिंग राजपूतची हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितल्यानंतर आता सत्ताधारी नेत्यांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टीका करणे सुरु झाले आहे.

विरोधकांनी सुशांत प्रकरणावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात रान उठवले होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस सुशांत सिंह प्रकरणाचा तपास दबावाखाली करत असून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला. दीड महिना उलटल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. यातच सत्ताधारी नेत्यांकडून एम्स डॉक्टरांच्या अहवालानंतर विरोधकांना लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यापाठोपाठ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावरुन भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.


जितेंद्र आव्हाडांनी याबाबत ट्विट केले आहे की, सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि BJPच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता CBIने मान्य केले आहे की, सुशांतने आत्महत्याच केली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजप नेत्यांना धारेवर धरले आहे.