कोरोनामुक्त होऊन लवकरच मी पुन्हा येईन – ट्रम्प


वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण आपली प्रकृती उत्तम असून आपण लवकरच कोरोनामुक्त होऊन देशाच्या सेवेसाठी लवकरच रुजू होईन, असे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. माझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी व मला बरे वाटावे यासाठी वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. मी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचे कार्य पाहून थक्क झालो असून ज्या ज्या रुग्णांनी कोरोनावर मागील सहा महिन्यात मात केली त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अमेरिका ही एक महासत्ता असून जगात अमेरिकेचा दबदबा आहे. मी लवकरच या देशासाठी कोरोनामुक्त होऊन परत येईन, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ट्रम्प यांनी हे वक्तव्य त्या व्हिडीओमध्ये केले आहे.


कोरोनाची लागण झाल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वतः यांनीच दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आपण मास्क वापरणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. पण आता कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. ट्रम्प दाम्पत्याला सौम्य लक्षणे असली तरी ट्रम्प यांचे वजन जास्त असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जाते आहे.