मुंबईतील लोकल सुरू करण्यावरुन रेल्वेमंत्र्यांचा मोठा खुलासा


मुंबई : मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील सर्व चाकरमानी एकीकडे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल कधी सुरू होते याची आतुरतेने वाट बघत असतानाच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे मंत्रालयाला रेल्वे सुरू करण्याबाबत अजून कोणतीही मागणी अथवा प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकल कधी सुरू होईल याबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे केंद्राने केलेल्या नव्या कृषी कायद्यातील गैरसमज दूर करून महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न विचारला असता, राज्य सरकारचा अजून कोणताही प्रस्ताव मुंबई लोकल सुरू करण्यासाठी आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार जोपर्यंत प्रस्ताव पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले असल्यामुळे मुंबई लोकल 15 तारखेपर्यंत सुरू करू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यासाठी राज्य सरकार रेल्वे मंत्रालयाला कधी प्रस्ताव पाठवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.