राज्य शिक्षणमंत्र्यांची माहिती; ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा दिवाळीनंतर सुरू करणार


अमरावती : राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही बंद आहेत. पण राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा दिवाळीनंतर सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेत कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच प्रवेश दिला जाणार असल्याचेही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता राज्यात अनलॉक सुरू आहे. सर्व बाबी या जवळपास खुल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी दिवाळीनंतर राज्यातील ९ ते १२ पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.

सरकारच्या वतीने या शाळा सुरु करत असताना एक चांगले धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाबाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिले जाईल अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर शिक्षकच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का? तसेच कोरोनाबाधित मुले शाळेत येऊ नये या साठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का? असाही विचार सुरू असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.