सुशांतसिंह प्रकरणाचा चौकशी अहवाल सीबीआयने सार्वजनिक करावा; अनिल देशमुख


मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी सिनेसृष्टीतील कंपूशाहीमुळे सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली असा आरोप करण्यात आला होता. तसेच या संदर्भातील काही बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या. यातच दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सुशांतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असा अहवाल सोपवल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सीबीआयने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अहवाल चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणातील सीबीआय चौकशी अहवालाची महाराष्ट्र सरकार प्रतीक्षा करत आहे. यासंदर्भात आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पुढील माहिती मिळेपर्यंत यावर भाष्य करणे उचित नाही. आम्हाला ज्यावेळी अधिकृत माहिती मिळेल त्यावेळीच आम्ही या प्रकरणावर भाष्य करु. आम्हाला याप्रकरणातील चौकशी अहवाल लोकांसमोर आणवा, अशी इच्छा आहे. ज्यामुळे सुशांतची हत्या होते की आत्महत्या? हे सर्वांनाच कळेल, असे अनिल देशमुख म्हणाले.