बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य;… तर आम्ही देखील भाजपमध्ये प्रवेश करु


मुंबई: अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक अशी ही तीन नवीन विधेयके केंद्र सरकारने मांडली असून ही विधेयके लोकसभेत मांडताना कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचा या कायद्यांमुळे फायदा होईल, असे म्हटले आहे. पण शेतकऱ्यांकडून या कृषी विषयक विधेयकांवरून केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन देखील करण्यात येत आहे. कामगार तसेच कृषी सुधारणा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील विरोध केला आहे. तसेच महाराष्ट्रात संसदेने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकांची अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट केले आहे.

दरम्यान आता राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी देखील केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध केला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘न्यूज 18 लोकमत’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानूसार, कृषी विधेयकावर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, हे बिल जसेच्या तसे आम्ही स्वीकारायला तयार आहोत. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नेहमी ५६ इंच छाती असल्याचे सांगतात, तसे नरेंद्र मोदींनी या विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात. शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असे कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, असे मोठे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.