ठाकरे यांची चेष्टा करणाऱ्या युट्युबरला मुंबई पोलिसांकडून गुपचूप अटक

फोटो साभार भास्कर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आदित्य त्यांच्याबाबत युट्यूबवर मत व्यक्त करणे एका युट्यूबर ला चांगलेच महागात पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरियाना मधील फरीदाबाद येथे राहणाऱ्या साहिल याला मुंबई पोलीसानी त्याच्या फरीदाबाद सेक्टर १९ मधील घरी जाऊन पकडून मुंबईला आणले आहे. विशेष म्हणजे या प्रकारची कोणतीही गंधवार्ता हरियाना पोलिसांना नाही. साहिल याचे वडील हरियाना मधील निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर आहेत.

साहिल जिम चालवितो आणि तो युट्यूब चॅनल ही चालवितो. तो पूर्वी मुंबईत होता पण लॉकडाऊन मुळे तो त्याच्या घरी फरीदाबाद येथे राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग प्रकरणात युट्यूब वर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काही विधाने केली होती. फेसबुकवर ही त्याने आदित्य यांच्या भूमिकेत जाऊन मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार आणि ठाकरे यांचे पूर्वज यांच्या संदर्भात काही विधाने केली होती. याची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी फरीदाबाद येथे साहिलच्या घरी जाऊन त्याला अटक करून मुंबई मध्ये आणले असे समजते.

फेसबुकवर साहिलने सुशांतसिंग प्रकरणात केंद्र सरकार काहीच करत नाही असेही म्हटले होते. सुशांतसिंग याचे मेहुणे ओ.पी सिंग हरियाना विभागाचे पोलीस प्रमुख आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोलीस विभागात बीट सिस्टीम लागू करून सर्व पोलिसांनी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही साहिल याला मुंबई पोलिसांनी पकडून नेल्याची खबर हरियाना पोलिसांना लागू शकली नाही असे सांगितले जात आहे.