मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन्ही राजेंनी भाजपकडूनच सोडवावा, शरद पवारांचा टोला

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे हे देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांना भाजपनेच राज्यसभेवर पाठवले आहे. त्यामुळे ते भाजपची भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा टोला लगावला आहे.

पंढरपूरात आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंच्या एनडीएमध्ये येण्याचा प्रस्तावावर ते म्हणाले की, रामदास आठवलेंचा एक आमदार तरी आहे का? एक खासदार तरी आहे का? त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, सभागृहातही घेत नाही आणि बाहेरही घेत नाही.

तसेच, हे सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचे म्हणत, त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावर देखील उत्तर दिले. शरद पवारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर देखील यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या  संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे.