विकास दुबे एन्काऊंटरप्रमाणेच पुन्हा पलटली उत्तर प्रदेश पोलिसांची गाडी, गँगस्टरचा मृत्यू

उत्तर प्रदेश पोलिसांची गाडी पलटल्याने पुन्हा एकदा एका गँगस्टरचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश पोलीस टीम कारने मुंबईवरून गँगस्टरला घेऊन लखनऊला परतत होते. यावेळी ग्वालियर-बैतूल मार्गावर एका टोल नाक्याजवळ ताबा सुटल्याने कार अचानक पलटी झाली. या अपघातात मुंबईतून पकडलेल्या आरोपीचा मृत्यू झाला. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 जण जखमी झाले.

गुनाचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी महाराष्ट्रातील नाला सोपारा भागातून आरोपी फिरोज अलीला अटक केले होते. पोलिसांची टीम आरोपीला लखनऊला आणत असताना वेगामुळे गाडी अचानक पलटली व यात आरोपी फिरोजचा मृत्यू झाला.

या गाडीमध्ये फिरोजचा एक नातेवाईक देखील होता. ज्याला ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोबत नेले होते. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी अशाचप्रकारे कुख्यात गँगस्टर विकास दुबेला देखील उज्जैनवरून उत्तर प्रदेशला आणताना पोलिसांची गाडी पलटली होती. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकास दुबेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता.