कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करून RBI, LIC सह सरकारी बँकांनी पीएम केअर्समध्ये दिले 205 कोटी

कोरोना संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम फंड केअर्सची सुरुवात करण्यात आली होती. अनेक प्रसिद्ध व्यक्ती, संस्थांनी या फंडमध्ये निधी दान केला. अनेक केंद्र शिक्षण संस्थांनी देखील कोव्हिड-19 च्या लढाईत लोकांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या या फंडमध्ये दान केले. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह 7 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात करत जवळपास 205 कोटी रुपये पीएम फंडमध्ये दान केल्याची माहिती समोर आली आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एलआयसी, जीआयसी आणि नॅशनल हाउसिंग बँकेने जवळपास 144.5 कोटी रुपये दान केले आहेत. या कंपन्यांनी सीएसआर आणि अन्य प्रोव्हिजनद्वारे ही रक्कम दान केली. एकट्या एलआयसीने 113.63 कोटी रुपये दान केले. याशिवाय 15 सरकारी बँका आणि इंस्टिट्यूटने पीएम केअर फंडमध्ये 350 कोटी रुपये दान केले आहेत.

सरकारी बँकांबाबत सांगायचे तर सर्वाधिक रक्कम आरबीआयने दान केली आहे. आरबीआयने 107.95 कोटी रुपये दान केले. ही रक्कम 31 मार्चला ट्रांसफर केली. आरबीआयने सांगितले की, ही रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कपात करून दिली. आरबीआयनुसार, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 7.34 कोटी दान केले.