दसऱ्यापासून सुरु होणार थियेटर्स?

फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स

करोना मुळे मार्च पासून बंद असलेल्या मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थियेटर्सना ९ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले असल्याने थियेटर्स पुन्हा सुरु व्हावीत यासाठी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन आणि केंद्र सरकार यांच्यात या संदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून ऑक्टोबर मध्ये येत असलेल्या दसऱ्यापासून ही थियेटर्स सुरु होऊ शकतील असे संकेत दिले गेले आहेत. चित्रपट वितरकांच्या मते लॉकडाऊन मध्ये सोसावे लागलेले नुकसान पुढील वर्षात रिलीज होत असलेल्या चित्रपटातून भरून निघू शकेल.

चित्रपट निर्माते गिरीश जोहर यांच्या मते २०२१ मध्ये मेगाबजेट आणि बडे स्टार्स असलेले अनेक चित्रपट येत असून ही संख्या साधारण १६ आहे. त्यातूनच ४ हजार कोटी मिळू शकणार आहेत. देशातील मुख्य मल्टीप्लेक्स चेन कार्निवलचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सहानी म्हणाले, दिवाळी, दसरा, ईद, २ ऑक्टोबर, होळी या काळात नेहमीच चित्रपट प्रदर्शनाची एकच गर्दी होते. आता थियेटर्स उघडण्याची शक्यता नजरेत आल्याने अपूर्ण चित्रपटांचे काम पूर्ण करण्यास वेग आला आहे. त्यामुळे नुकसान भरून येण्यास मदत होईल.

देशात एकूण ९ हजार थियेटर्स असून २६०० मल्टीप्लेक्स आहेत. त्यात पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हल आणि सिनेपोलीस मुख्य आहेत. या वर्षात ८३, सूर्यवंशी या बॉलीवूड पटांची तर नो टाईम टू डाय हा हॉलीवूडपट, वॉर्नर ब्रदर्सचा टेनेट, मुलान हा डिस्ने पट अपेक्षित आहेत. भारतात १००० चित्रपट दरवर्षी तयार होतात पण त्यातील ३०० चित्रपटानाच थियेटर्स मिळू शकतात. ओटीटीवर काही चांगले चित्रपट प्रदर्शित झाले पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे थियेटर्स उघडायची प्रतीक्षा निर्माते करत आहेत.