करोनाची नवी लक्षणे आढळली

बहुरुप्याप्रमाणे सतत रूप बदलत राहिलेल्या करोना विषाणूने संशोधकांना बेजार केले असून आता करोनाची नवी लक्षणे समोर आली आहेत. करोना श्वास विकार असलेल्यांना अधिक धोकादायक असून तो फुफुसे निकामी करतो असे सुरवातीला दिसत होते पण आता करोना शरीरातील इतर अवयवांना सुद्धा निकामी करत असल्याचे दिसत आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने करोनाची नवी लक्षणे सांगणारी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार डोळे खाजणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि अंगावर, डोळ्यावर सूज येणे अशी ही नवी लक्षणे आहेत.

करोनाने गेले दहा महिने सर्व देशांना वेठीला धरले आहे आणि त्याचे संक्रमण रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत मात्र त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. जगभरात करोना संक्रमितांची संख्या ३ कोटी पार करून गेली आहे आणि करोना वरची लस अजून तयार नाही. काही कंपन्यांची लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. पण प्रत्यक्षात लसी करण सुरु होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागेल असे संकेत मिळत आहेत.

करोना मधून बरे झालेल्या अनेक रुग्णांना डोकेदुखी, थकवा याचबरोबर बेचैनी, द्विधा मनस्थिती अशी लक्षणे दिसत असून त्यामुळे करोना मेंदूव्यवस्थेवर सुद्धा परिणाम करत असावा असे मानले जात आहे. कोरडा खोकला हे करोना लागणीचे मुख्य लक्षण असले तरी काही रुग्णांना सतत १ ते चार तास खोकल्याचा त्रास सुद्धा झाला आहे. त्वचेवर सूज, डाग पडणे, त्वचेचा रंग बदलणे अशी वेगळी लक्षणे युवक रुग्णात अधिक प्रमाणात दिसत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.