आयफोन इंजिनिअर्सनी अॅपल साठी बनविले विशेष करोना मास्क

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

जगभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच असून त्यावर नियंत्रण येण्याची शक्यता नजीकच्या काळात दिसत नसल्याचे चित्र आहे. बहुतेक सर्व देशातील सरकारांनी त्यामुळे मास्क वापर आणि सोशल डीस्टन्सिंग बंधनकारक केले आहे. तरीही बडी टेक कंपनी अॅपल ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षा मिळावी म्हणून विशेष मास्क तयार केले असून त्याचे वाटप सुरु केले आहे.

या मास्कची सर्वात विशेष बाब म्हणजे आयफोन आणि आयपॅड विकसित करणाऱ्या इंजिनिअर्सनीच हे मास्क डिझाईन केले आहेत. ‘क्लिअर मास्क’ असे त्याचे नामकरण केले गेले आहे. हे मास्क तयार करताना वेगळे तंत्र वापरले गेल्याचे समजते. हे मास्क तीन पदरी असून नाक किंवा तोंडात जाणारे किंवा नाकातोंडातून बाहेर पडणारे कण फिल्टर होऊनच बाहेर पडणार आहेत. हे मास्क पाच वेळा धुता येतील आणि पुन्हा वापरता येणार आहेत. मास्क मुळे नाक आणि हनुवटी पर्यंतचा भाग खालून वरून व्यवस्थित कव्हर केला जाणार आहे. शिवाय हे मास्क फिट बसले तरी त्यामुळे कान दुखणार नाहीत. हे मास्क वापरात आणण्यापूर्वी त्याच्या अनेक टेस्ट घेतल्या गेल्याचेही सांगितले जात आहे.