शहरीविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण

महाराष्ट्राचे शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी कोविड १९ ची लागण झाल्याचे उघड झाले असून त्यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. ते म्हणाले माझी प्रकृती चांगली आहे. तुमच्या साऱ्यांच्या शुभेच्छा आहेतच. या आठवड्याच्या सुरवातीला ते मंत्रीमंडळाच्या बैठकीत सामील झाले होते त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी करोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. करोनाची लागण झालेले ते १३ वे मंत्री आहेत.

यापूर्वी जितेंद्र आव्हाड, पीडब्यूडी मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पशुपालन मंत्री सुनील केदार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख, उर्जा मंत्री नितीन राउत, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ग्रामीण विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम हेही करोनाच्या विळख्यात सापडले होते.

राज्यात गेल्या २४ तासात २१,०२९ नवे रुग्ण सापडले असून करोनाबाधितांची एकूण संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे. त्यातील ९,५६,०३० रुग्ण बरे झाले असून मृतांची संख्या ३३८८६ वर गेली आहे. पुण्यात गेल्या २४ तासात १७९७ नवीन रुग्ण मिळाले असून एकूण रुग्ण संख्या १,४६,०६२ वर गेली आहे. मृतांचा आकडा ३३२९ वर पोहोचला आहे.