बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्यास त्वरित करा हे काम, परत मिळतील पैसे


कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही काय करायला हवे, याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे. याबाबत आरबीआयने 2017 साली एक परिपत्रक देखील जारी केले होते.

आरबीआयनुसार, जर बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील अथवा फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत याबाबत बँकेला सुचना द्यावी. बँकेला याची माहिती देणे अनिवार्य आहे. जर असे केल्यास याप्रकरणात तुमची झिरो लायबिलिटी असेल. जर असा व्यवहार अथवा फसवणूक तुमच्या चुकीमुळे झाले नसल्यास बँक तुम्हाला नुकसान भरपाई देईल.

जर तुम्ही बँकेला फसवणुकीनंतर 4 ते 7 दिवसांच्या कालावधीत माहिती दिल्यास तुमची मर्यादित लायबिलिटी असेल. म्हणजेच तुम्हाला पुर्ण रक्कम परत मिळणार नाही. समजा, तुमचे बेसिक सेव्हिंग बँकिंग डिपॉजिट अकाउंट म्हणजे झिरो बॅलेंस अकाउंट असल्यास तुमची लायबिलिटी 5 हजार रुपये असेल. जर तुमच्या खात्यातून 10 हजार रुपये न सांगता काढले गेले असल्यास, तुम्हाला 5 हजार रुपये मिळतील व 5 हजार रुपयांचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल. जर तुमचे सेव्हिंग अकाउंट असेल तर 10000 हजार रुपये लायबिलिटी असेल.

जर तुमचे करंट अकाउंट आहे अथवा 5 लाख रुपयांपेक्षा अधिक लिमिटच्या क्रेडिट कार्डवरून अनधिकृत व्यवहार झाला असल्यास तुम्हाला 25 हजार रुपयांच्या लायबिलिटी मिळेल. म्हणजेच तुमची 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्यास तुम्हाला 25 हजार रुपये परत मिळतील. जर तुम्ही फसवणुकीनंतर 7 दिवसांनी बँकेला माहिती दिल्यास, तुमची लायबिलिटी कशी ठरवायची हे बँकेवर अवलंबून असते.