भारत बायोटेक आणतेय नाकातून घ्यायची करोना लस

फोटो साभार न्यूज बाईट्स

कोविड १९ प्रतिबंधासाठी जगभरात अनेक देशात लस बनविण्यासाठी संशोधन सुरु असतानाच हैद्राबाद येथील भारत बायोटेक कंपनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या सहकार्याने नाकातून घेता येणारी कोविड १९ लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत कोविड साठी ज्या लसी तयार होत आहेत त्या सर्व इंजेक्शन स्वरुपात आहेत. मात्र ही लस नाकातून देता येणार आहे. नोवल चीम्प एडेनाव्हायरस सिंगल डोस इंट्रानेझल साठी भारत बायोटेक आणि वॉशिंग्टन विद्यापिठ यांच्यात बुधवारी सहकार्य करार झाल्याची घोषणा केली गेली आहे.

भारत बायोकडे अमेरिका, जपान आणि युरोप सोडून अन्य सर्व जागतिक बाजारात लस वितरित करण्याचे अधिकार आहेत. या लसीच्या परीक्षणाचा पाहिला टप्पा वॉशिंग्टन विद्यापीठात पार पडणार असून परवानगी मिळाल्यावर भारतात या लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरु होणार आहेत. हैद्राबादच्या जीनोम व्हॅलीतील जीएमपी कारखान्यात लस उत्पादन केले जाणार आहे. या लसीचे उंदरावर केले गेलेले प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले आहेत त्यासंदर्भात वैज्ञानिक जर्नल सेल आणि नेचर मध्ये लेख आले आहेत.

भारत बायोचे अध्यक्ष कृष्णा एल्ला या संदर्भात बोलताना म्हणाले, कंपनी १ अब्ज डोस तयार करू शकणार आहे. ही लस देताना सुई किंवा सिरींजची आवश्यकता नाही. नाकातून डोस दिल्यामुळे केवळ करोनाच नाही तर अन्य प्रकारच्या जंतू साठी सुद्धा प्रतिकार क्षमता वाढू शकणार आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठातील मेडिसिन स्कूलचे डॉक्टर डेव्हिड यांनीही नाकातून लस देण्याचे अनेक फायदे असल्याचे म्हटले आहे. ते सांगतात, नाकातून दिलेली लस सहज देता येते आणि व्यापकप्रमाणात नाकात पसरते त्यामुळे नाक आणि घश्यातून आत जाऊन उपद्रवी ठरणाऱ्या अन्य जंतूपासून सुद्धा संरक्षण मिळविणे शक्य होणार आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या लसीमुळे हा फायदा मिळू शकत नाही.