करोना मुळे बॉलीवूडचे ३२०० कोटींचे कलेक्शन अडकले

करोनामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. गेले सात महिने चित्रपटगृहे बंद असल्याने नवीन चित्रपट रिलीज होऊ शकलेले नाहीत. परिणामी ३२०० कोटींचे कलेक्शन अडकले असल्याचे व्यवसाय विश्लेषक राज बन्सल यांचे म्हणणे आहे. १३ मार्च रोजी शेवटचा इंग्लिश मिडीयम हा चित्रपट रिलीज झाला आणि तेव्हापासूनचे अनेक राज्यांनी चित्रपटगृहे बंद केली ती अद्यापी सुरु झालेली नाहीत. काही निर्मात्यांनी ओटीटी वर चित्रपट रिलीज केले असले तरी सर्वाना चित्रपटगृहे परत सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

राज बन्सल चित्रपट वितरक म्हणूनही कार्यरत आहेत. ते म्हणाले, या सात महिन्यात सूर्यवंशी, ८३, कुली नंबर १, लक्ष्मी बॉम्ब, राधे, भुज द प्राईड ऑफ इंडिया, द बिग बुल, सडक २ असे अनेक बडे चित्रपट रिलीज होणार होते त्याचेच कलेक्शन १५०० कोटींच्या वर झाले असते. दर आठवड्याला दोन सरासरी आणि दोन मिडीयम व छोटे बजेट असलेले चित्रपट रिलीज होतात. त्यांची सरासरी कमाई प्रत्येकी २५ ते ३० कोटी असते. या हिशोबाने ३० सप्टेंबरपर्यंत ५८ चित्रपट रिलीज झाले असते. त्याचे १५०० ते १७०० कोटींच्या दरम्यान कलेक्शन झाले असते.

लॉकडाऊन मुळे तमिळ, तेलगु चित्रपटसृष्टीवर ही परिणाम झाला आहे. तेथेही बडे बजेट चित्रपट रिलीज होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांचेही १५०० कोटींचे कलेक्शन अडकले आहे. २०२०च्या सुरवातीला ७३ दिवस चित्रपटगृहे सुरु होती त्याकाळात ८२४ कोटींचे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर झाले होते. त्यात अजय देवगणच्या तानाजी द अनसंग हिरो ची कमाई सर्वधिक २८० कोटींची होती.