निलंबित खासदारांच्या समर्थनात शरद पवार करणार अन्नत्याग


राज्यसभेतील गोंधळानंतर निलंबित करण्यात आलेल्या 8 खासदारांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे आले आहे. शरद पवार यांनी खासदारांच्या समर्थनात आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार म्हणाले की, मी देखील त्यांच्या आंदोलनात भाग घेणार आणि त्यांच्या समर्थनात एक दिवसाचा उपवास ठेवणार नाही. सोबतच त्यांनी कृषी विधेयकावरून देखील सरकारवर टीका केली.

राज्यसभेत कृषी विधेयकावर चर्चेदरम्यान गोंधळ घातल्यानंतर 8 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे आठही खासदार संसदेच्या परिसरात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे उपसभापती हरिवंश यांनी देखील आपल्या अपमानाच्या विरोधात एक दिवसांचा उपवास करणार असल्याचे म्हटले आहे.

राज्यसभेत यापूर्वी जे घडले नाही ते पाहायला मिळाले. राज्यसभेत कृषी विषयक विधेयके येणार होती. या विधेयकांवर दोन-तीन दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. ही विधेयक तातडीने मंजूर करावी अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका होती. या विधेयकांबाबत सदस्यांना प्रश्न होते, चर्चा करण्याचा आग्रह होता. परंतु हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे काम पुढे रेटून नेण्याचं दिसत होते, असे म्हणत शरद पवारांनी कृषी विधेयकावरून सरकारवर निशाणा साधला.

एकीकडे परवानगी दिली जाते, मात्र त्याचवेळी कांद्यावर निर्यात बंदी घातली जाते. जेएनपीटीमध्ये शेतमाल पडून असल्याचं सांगितल्यानंतर परवानगी दिली जाते. पण इतर मालाचे काय? हा विरोधाभास आहे, असेही ते म्हणाले.