राज्याच्या गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट; पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न


मुंबई : लोकमत ऑनलाईनच्या विशेष मुलाखतीत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही यात समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असे अनिल देखमुखांनी सांगितले.

आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात चर्चा झाल्यानंतर हे प्रकरण मार्गी लावण्यात आल्याचेही अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले.

एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन शरद पवारांनी त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगितले होते. तसेच त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेल्याचेही अनिल देशमुख म्हणाले. नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही त्यांना महत्त्वाची पदे दिली असल्याचेही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या सर्व प्रकरणानंतर अनिल देशमुखांवर टीका केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी असे बोलणे अपेक्षित नाही. महाराष्ट्रात अशा अधिकाऱ्यांची हिंमत नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. कोरोनापासून लक्ष विचलित करण्यासाठी ते मुलाखत देत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.