चिखलात बसून शंख वाजवल्याने कोरोना होत नाही, असा दावा करणाऱ्या खासदाराला कोरोनाची लागण


चिखलात आंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल असा दावा करणाऱ्या टोंक-सवाई माधोपूरचे भाजप खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपुर्वी जौनपुरिया शंख वाजवल्याने कोरोना होत नाही असा दावा केल्याने चर्चेत आले होते. मात्र आता त्यांनाच कोरोनाची लागण झाले.

जौनपुरिया हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले होते. यावेळी अनिवार्य असलेली कोरोना चाचणी त्यांनी केली. यात 30 खासदारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा देखील समावेश आहे.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी भाजपा खासदाराचा ‘अजब’ सल्ला; चिखलात आंघोळ करा अन् शंख वाजवा

जौनपुरिया यांचा चिखलात बसून शंख वाजवतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. ज्यात ते यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव होतो असा दावा करत आहेत. याआधी देखील त्यांचा आगीमध्ये बसून योग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दरम्यान, जौनपुरिया या मागील काही दिवसात टोंक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक अधिकारी व नेत्यांसोबत बैठक घेतली होती. सोबतच गरींबाना जेवण वाटप देखील केले होते. त्यामुळे आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याने भितीचे वातावरण तयार झाले आहे.