टोंक : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जगभरातील अनेक देशांकडून कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच याकाळात कोरोनापासून बचान करण्यासाठी भाजपमधील अनेक नेते वेगवेगळे अजब सल्ले देताना दिसत आहेत.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी भाजपा खासदाराचा ‘अजब’ सल्ला; चिखलात आंघोळ करा अन् शंख वाजवा
काही महिन्यांपूर्वी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिला होता. त्यानंतर कोरोना टाळण्यासाठी आता भाजपच्या आणखी एका खासदाराने एक अजबच सल्ला दिला आहे. या खासदार महाशयांनी चिखलात आंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला दिला आहे. आता सर्वच माध्यमांमध्ये खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या सोशल मीडियात राजस्थानमधील टोंक येथील भाजप खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते यामध्ये चिखलात आंघोळ करत शंख वाजवताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये ते कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. रोग प्रतिकारशक्ती औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने रोग प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी रोग प्रतिकारशक्ती वाढते, असे म्हणत आहेत.
कोरोना टाळण्यासाठी औषध खाण्याची नक्कीच गरज नसल्याचे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी म्हटले आहे. स्वत: सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी चिखलात आंघोळ करून आणि शंख वाजवून आपली प्रतिकारशक्ती वाढवल्याचा दावा केला आहे. तसेच, सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगली पाने आणि कोरफड खाण्याचा सल्ला दिला.