एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 कलमी कार्यक्रमावर सहमती


एलएसीवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्या झालेल्या बैठकीत तणाव कमी करम्यासाठी 5 कलमी कार्यक्रमावर एकमत झाले आहे. सोबतच दोन्ही देशांनी ही चर्चा पुढे कायम ठेवत सीमेवरील सैनिकांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री शंघाई सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोमध्ये आहेत. यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाली व सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगाने पुर्ण करण्याचा निर्णय झाला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमध्ये एकमत झाले की देशांमधील संबंध विकसित करण्यासाठी झालेल्या चर्चेमधून मार्गदर्शन घ्यावे व मतभेदांना वादाचे कारण बनवू नये.

दोन्ही परराष्ट्र मंत्रालयांद्वारे जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, दोन्ही मंत्र्यांनी भारत-चीन सीमाभागासह देशांमधील संबंधाबाबत झालेले घटनाक्रमावर स्पष्ट आणि रचनात्मक चर्चा केली. दोन्ही पक्षांमध्ये पुढे चर्चा सुरू ठेवण्यास सहमती झाली असून, लवकरच सैन्य हटविण्याची प्रक्रिया सुरू होईल. सीमेवर योग्य ते अंतर ठेवले पाहिजे व तणाव कमी करण्यासंदर्भात एकमत झाले.

आजतकच्या वृत्तानुसार, या चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमावर्ती भागांच्या सर्व कराराचे पूर्णपणे पालन करणे अपेक्षित आहे आणि स्थिती एकतर्फी बदलण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, वांग यी यांनी सीमावर्ती भागातील परिस्थितीबाबत चीनच्या स्थितीची माहिती दिली. तसेच दोन्ही बाजूंच्या आश्वासनांचे उल्लंघन करणाऱ्या गोळीबार आणि इतर भडकविण्याच्या धोकादायक हालचाली त्वरित थांबवाव्यात असे म्हटले.