पोप फ्रान्सिस प्रथमच मास्क मध्ये दिसले

खिश्चन धर्माचे मुख्य गुरु पोप फ्रान्सिस बुधवारी प्रथमच तोंडाला मास्क लावून आल्याचे दिसले आहे. व्हॅटीकन सिटी मधील एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी ते आले तेव्हा गाडीतून येताना त्यांनी मास्क लावला होता मात्र गाडीबाहेर उतरताना त्यांनी मास्क काढून टाकला. करोना संक्रमितांची संख्या जगभरात २ कोटी ८० लाख,१९ हजार ६३९ वर गेली असून त्यातील दोन कोटींहून अधिक रुग्ण बरेही झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. जगभरात करोना साथीने ९ लाखांहून अधिक बळी घेतले आहेत.

या सहा महिन्याच्या काळात पोप फ्रान्सिस फारच कमी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. पण यापूर्वी जेव्हा ते अश्या कार्यक्रमात दिसले तेव्हा त्यांनी मास्क लावलेला नव्हता. बुधवारी ते प्रथमच मास्क मध्ये पाहिले गेले. गेल्या सहा महिन्यात पोप दुसऱ्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना भेटले. नेहमीचा रिवाज असा आहे की पोप सर्वसामान्य लोकांना भेटतात तेव्हा हस्तांदोलन करतात आणि लहान मुलांच्या माथ्याचे अवघ्राण करतात मात्र यावेळी त्यांनी बुधवारी या दोन्ही प्रथा पाळल्या नाहीत असेही समजते.