महानगरपालिकेच्या कारवाईमुळे कंगनाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली – शरद पवार


अभिनेत्री कंगना राणावत सध्या मुंबईबाबत केलेल्या विधानामुळे सध्या चर्चेत आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर अनाधिकृत बांधकाम असल्याचे म्हणत कारवाई केली. याप्रकरणात कंगना उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कंगना प्रकरणावर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे कंगनाला अनावश्यक प्रसिद्धी मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, मला माध्यमांनी दाखवलेल्या कव्हरेजवर आक्षेप आहे. माध्यम अशा गोष्टी मोठ्या करतात. आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. अनाधिकृत बांधकाम ही काही मुंबईत नवीन गोष्ट नाही. मात्र सध्या सुरू असलेल्या वादानंतर अशी कारवाई करणे प्रश्न निर्माण करते. बीएमसीची यासाठी त्यांची स्वतःची कारणे व नियम आहेत. त्यांनी त्याप्रमाणेच कारवाई केली आहे.

दरम्यान, महानगरपालिकेकडून कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर अभिनेत्रीने आज पुन्हा एकदा मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्याचे म्हटले. तसेच मुंबई पोलिसांचा बाबर आणि त्याचे सैन्य असा उल्लेख केला आहे.