करोना काळात शेअरबाजारात महिला गुंतवणूकदरांची संख्या वाढली

देशात गेल्या पाच महिन्यांपासून अधिक काळ धुमाकूळ घालत असलेल्या कोविड १९ महामारी मुळे अनेकांना आर्थिक संकट भेडसावू लागले असताना शेअर बाजारात महिला गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असल्याचे दिसून आले आहे. कोविड १९ साथीमुळे नोकऱ्यात झालेली कपात, पगारातील कपात, बँकांनी घटवलेले मुदत ठेवींचे दर यामुळे महिला बचत आणि कमाईचे अन्य पर्याय शोधू लागल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची नजर शेअर बाजाराकडे वळली असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

शेअरखान बाय बीएनपी परीभासचे प्रमुख शंकर वैलाया यांच्या मते लॉकडाऊन काळातील हा एक फायदा म्हणायला हवा. या निमित्ताने महिलांना डिजिटल माध्यमातून शेअर बाजाराची माहिती मिळविता आली. एप्रिल ते जून या काळात मोठ्या संख्येने महिलांनी शेअर बाजारात खाती उघडली आणि त्यात प्रथमच गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे केवळ मोठ्या शहरातूनच नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरातून सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात पाउल टाकले आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले असून त्यातील ७० टक्के महिला प्रथमच अशी गुंतवणूक करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांमध्ये गृहिणी असलेल्या महिलांची संख्याही लक्षणीयरित्या वाढत चालली असल्याचेही दिसून आले आहे. या माध्यमातून आपल्या घरखर्चाचा थोडा भार उचलण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून केला जात असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.