कंगना राणावत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? – राम कदम


मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगना राणावतला फटकारल्यानंतर पुन्हा एकदा तिच्या मदतीला भाजप आमदार राम कदम धावून आले आहेत.

गुरुवारी यासंदर्भात राम कदम यांनी ट्विट करून म्हटले की, शिवसेनेतील एका बड्या नेत्याने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पुन्हा एकदा कंगना राणावतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे. मुंबईत कंगना राणावतने येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. पण मुंबईत कंगना राणावत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला कंगना तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत असल्याचे राम कदम यांनी म्हटले.

ही नावे कंगना राणावतच्या मुखातून निघाल्यास महाराष्ट्र सरकारच अडचणीत येण्याची शक्यता असल्यामुळे तिला शिवसेनेच्या नेत्यांकडून धमकी दिली जात आहे. पण कंगना राणावतही झाशीची राणी आहे. शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना ती घाबरणार नसल्याचे राम कदम यांनी म्हटले.