मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात रोहित पवारांची जोरदार बॅटिंग


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीवरुन विरोधक वारंवार धारेवर धरत आहेत. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नसल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत विरोधकांना काही प्रतिप्रश्न विचारले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका करताना राज्यावर कोरोना संकटामुळे ओढावलेल्या परिस्थितीतही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात राज्य सरकार व्यस्त असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की आम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बिझी आहोत, असे ते बोलत आहेत, मग आम्हीही म्हणतो की, विरोधी पक्षनेते राज्य अडचणीत असताना बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात? त्यांना राजकीय स्टेटमेंट करण्याची सवय आहे. कोल्हापुरात पूर असताना कर्नाटकची चूक झाली होती, तसे त्यांनी कबूल केले. आता पूर्व विदर्भातील पुराबाबत एमपी सरकारने विश्वासात घेतले नसल्याचे दिसत असल्याचे पवार म्हणाले.

तुम्ही म्हणता मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहेत? ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करत आहेत ना? राज्य सरकारला केंद्र सरकारकडून जीएसटीचा फंड मिळत नसतानाही चांगले काम करत असल्याचे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. जे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्याबाबतीत झाले ते वाईट झाले, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. जे झाले ते चुकीचे झाले. यात शहानिशा करण्याची गरज आहे व त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.