अवघ्या पाच महिन्यातच खरे ठरले राहुल गांधींनी वर्तवलेले भाकित


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाविरोधात नागरिक आपआपल्या परीने लढा देत आहेत. तरी देखील या रोगाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसून देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे देभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ लाखांच्या पुढे गेला आहे. एकीकडे देश कोरोनाशी लढा देत असतानाच दुसरीकडे देशावर कोरोनाचे आर्थिक संकट देखील ओढावले आहे. चार दशकांमध्ये पहिल्यांदाच देशाचा जीडीपी प्रचंड घसरला आहे. सध्या सगळीकडे जीडीपीच्या आकड्यांबद्दल चर्चा सुरू आहे. पण कोरोना संकट देशाच्या उंबरठ्यावर असतानाच याविषयी मोदी सरकारला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावध केले होते. जीडीपीच्या आकड्यांनी राहुल गांधी यांचा तोच इशारा खरा ठरवला आहे.

सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झाले. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

देशावर ओढवू शकणाऱ्या आर्थिक अरिष्टाविषयी नोटबंदी, जीएसटी, लॉकडाउनच्या निर्णयांवरून मोदी सरकारवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधीच सरकारला इशारा दिला होता. राहुल गांधी यांनी मार्च २०१७ रोजी येऊ घातलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केले होते. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर २४ टक्क्यांनी जीडीपी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाणे खूप दुर्दैवी असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

कोरोनाचा प्रसार चीननंतर इतर देशात सुरू झाला. त्यावेळी यासंदर्भात मोदी सरकारला काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी सावध केले होते. कोरोनाचे संकट गंभीर असल्याचे त्यांनी मोदी सरकारला सांगितले होते. १२ फेब्रुवारी रोजी ट्विट करून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सावध होण्याचा इशारा दिला होता. कोरोना भारतातील लोकांसाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. मला असे वाटते की, हा धोका केंद्र सरकार गांभीर्याने घेतना दिसत नाही. त्याविरोधात वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारला इशारा दिला होता.