इम्तियाज जलील यांचा चंद्रकांत खैरेंना टोला; कोणीही हिंदू धर्माला आपली मक्तेदारी समजू नये


औरंगाबाद – राज्यात आजपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु झाला असून, यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आहे. पण लॉकडाऊन सुरु झाल्यापासून बंद असलेल्या धार्मिक स्थळांबाबतचा कोणताही निर्णय यावेळी घेण्यात आलेला नाही. यावरुन आक्रमक झालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिरे आणि मशिदी खुली करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

मंदिरे उघडण्यासाठी पुजाऱ्यांना एमआयएमने सुरू केलेल्या मोहिमेतंर्गत निवेदन दिले जाणार असल्याची माहिती जलील यांनी दिली. या अंतर्गत एमआयएम कार्यकर्ते औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची भेट घेऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. त्याचबरोबर एमआयएमची मशिदी उघडण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे जलील म्हणाले.

कुणीही हिंदू धर्माचा ठेकेदार नाही. त्याचबरोबर कुणीही हिंदू मंदिरे आणि धर्माला आपली मक्तेदारी समजू नये. धर्माच्या नावाने ज्यांना राजकारण करायचे आहे, ते लोक असा वाद घालतात. मी जनतेचा खासदार असून जनतेचे प्रश्न मी सोडवणार. मंदिरात मी गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत, असे जलील म्हणाले.

त्याचबरोबर राज्यातील उद्योगधंदे तसेच बाजारपेठा उघडल्या जातात, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही. फक्त धार्मिक स्थळांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, असे कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

जलील यांच्याकडून मंदिर उघडण्याच्या घोषणेनंतर औरंगाबादचे माजी शिवसेना खासदार चंद्रकांत खरै खडकेश्वर मंदिरात गेले. खैरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मंदिर उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मंदिरे खुली करू. पण, मंदिर उघडे करा हे सांगणारे इम्तियाज जलील कोण. ते यावरुन राजकारण करत असून हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेने सोडली असे त्यांना दाखवून शिवसेनेला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. पण हे आम्ही सहन करणार नाही.