श्रीनगर सेक्टरच्या सीआरपीएफ महानिरीक्षकपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची नियुक्ती


नवी दिल्ली : आता एका महिला आयपीएस अधिकाऱ्यावर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चारू सिन्हा यांची श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी (आयजी) केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) नियुक्ती केली आहे. त्यामुळे सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचे महानिरीक्षक बनविण्यात आलेल्या चारु सिन्हा या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या आहेत.

तेलंगणा कॅडरच्या १९९६ बॅचच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरचा महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. चारू सिन्हा यांच्याकडे अशी जबाबदारी सोपविण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्या याआधी सीआरपीएफ बिहार सेक्टरच्या महानिरीक्षक होत्या आणि नक्षलवाद्यांविरोधात त्यांनी धडक मोहीम राबविली होती. चारू सिन्हा यांची बिहारनंतर बदली महानिरीक्षक म्हणून जम्मूला करण्यात आल्यानंतर आता श्रीनगर सेक्टरमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

२००५ मध्ये श्रीनगर सेक्टरचे सीआरपीएफचे सध्याचे महासंचालक (डीजी) एपी माहेश्वरी सुद्धा महानिरीक्षक होते.याठिकाणी महानिरीक्षक म्हणून आतापर्यंत महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नव्हती. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने दहशतवादविरोधी मोहीम राबविणे या श्रीनगर सेक्टरचे काम आहे. सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरमध्ये जम्मू-काश्मीरचे तीन जिल्हे बडगाम, गांदरबल, श्रीनगर आणि लडाखचा परिसर येतो. या सेक्टरमध्ये २ रेंज, २२ कार्यकारी युनिट आणि तीन महिला कंपनी येतात.