नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन या तिन्ही गोष्टींचा असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा उद्देश – राहुल गांधी


नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत देशातील कामगारांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. ‘अर्थव्यवस्था की बात’ या व्हिडीओद्वारे राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदी सरकारने नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन हे ती चुकीचे निर्णय घेतले. असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा या तिन्हींचा उद्देश असून, तुम्हाला लुटले जात आहे. याद्वारे तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्याविरोधात लढा देण्यासाठी एकजूट व्हा, असे आवाहन देशभरातील कामगारांना राहुल गांधी यांनी केले आहे.

‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणार आहेत. त्याचा पहिला व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट केला असून, त्याद्वारे त्यांनी देशातील असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा असल्याचा आरोप केला आहे.

असंघटित अर्थव्यवस्थेवर भाजपा सरकारने आक्रमण केले असून याद्वारे तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिक मंदी २००८ मध्ये आली. अमेरिका, जपान, युरोप, चीनसह सगळीकडेच आर्थिक मंदी आली. अमेरिकेतील बँका कोसळल्या. कंपन्या बंद झाल्या. एकपाठोपाठ एक कंपन्या बंद होत गेल्या. युरोपमधील बँकांही कोसळल्या. पण भारतात याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळी काँग्रेसप्रणित युपीएचे सरकार होते. पंतप्रधानांकडे मी गेलो. मनमोहन सिंग यांना मी विचारले, संपूर्ण जगात आर्थिक नुकसान झाले आहे. पण भारतावर कोणताही परिणाम झालेला नाही. यामागचे कारण काय? त्यांनी मला त्यामागचे कारण सांगितले.

भारताची अर्थव्यवस्था जर समजून घ्यायची असेल, तर सर्वात आधी हे समजून घ्यावे लागेल की, दोन अर्थव्यवस्था भारतात आहेत. पहिली असंघटित अर्थव्यवस्था आणि दुसरी संघटित अर्थव्यवस्था असून मोठ्या कंपन्या संघटित अर्थव्यस्थेत येतात. जी नावे आपल्याला माहिती आहेत. शेतकरी, कामगार, किरकोळ विक्रेते, लघू व मध्यम कंपन्या असंघटित अर्थव्यवस्थेत येतात. भारतातील असंघटित व्यवस्था जोपर्यंत मजबूत राहिल, तोपर्यंत भारतावर कोणतेही आर्थिक संकट येऊ शकणार नाही.