दंड भरुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार प्रशांत भूषण


नवी दिल्ली – ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे म्हटले असून प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी, तसेच त्यांनी तीन वर्षांसाठी वकिली करण्यापासून रोखण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आपण दंड भरण्यासाठी आनंदाने तयार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे प्रशांत भूषण यांनी यावेळी सांगितले. प्रशांत भूषण यांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने शिक्षा सुनावली. दंड भरण्यासाठी प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आपण आनंदाने दंड भरण्यास तयार आहे, पण आपल्याला दोषी ठरवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मला हक्क आहे. त्याचबरोबर न्यायालयाचा अवमान करण्याच्या उद्धेशाने माझे ट्विट नव्हते, तर मला जे वाटले ते मी म्हटले होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा महत्त्वाचा क्षण होता आणि यामुळेच अनेकांना अन्यायाविरोधात बोलण्यात बळ मिळाल्याचे दिसत आहे. दरम्यान न्यायालयाने निकाल दिल्यानंतर प्रशांत भूषण यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले वकील आणि ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी एक रुपयाचा दंड भरला असून आपण ते तात्काळ स्वीकारल्याचे म्हटले आहे.