कंगना राणावतची महाराष्ट्र पोलिसांवर टीका; संजय राऊतांनी घेतले फैलावर


मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्यावर सातत्याने भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, आपल्या मुव्ही माफियांपेक्षा आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. त्यावरुन आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलीच फैलावर घेत, राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री कंगना राणावतने मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर मला हिमाचल अथवा केंद्र सरकारनेच सुरक्षा पुरवावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज, असे देखील म्हटले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती जर हिमाचल प्रदेशमध्ये राहत असेल आणि ती जर असे म्हणत असेल की शिमला पोलिसांवर माझा विश्वास नाही. मी अशा वेळी म्हणेल की जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको. तुम्ही जिथे राहता, खाता, कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे.

जर एखाद्या राज्यात मी राहतो, तर पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा माझा अधिकार आहे. जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर योग्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना मी आवाहन करतो की, मुंबई पोलिसांविषयी जे लोक वाईट बोलत आहेत आणि अशा व्यक्तींचे राज्यातील जे राजकीय पक्ष समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी, असे राऊत म्हणाले.