विजय वडेट्टीवारांची माहिती; राज्यात ई-पास बंद होण्याची शक्यता कमीच


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार ई-पास बंद करावा यावर अनुकूल नाही. त्याचबरोबर ज्यांना गरज आहे अशानाच ई पास दिला जात असल्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. नुकतीच अनलॉक संदर्भातील नवी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यात ई-पासवरीव निर्बंध उठवण्याच्या सूचना केल्या आहेत. पण यासाठी राज्य सरकार अनुकूल नसल्याचे सूर उमटत आहेत.

वास्तविक, ई-पासवरून लोकांमध्ये नाराजी असल्यामुळे राज्य सरकार केंद्राच्या नियमानंतर याबाबत नेमकी काय भूमिका घेणार आगामी काही दिवसातच स्पष्ट होईल. उद्यापर्यंत राज्य सरकारची नवीन नियमावली येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने इयत्तेतील वर्ग सुरू कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती, वडेट्टीवार यांनी दिली आहे.

जिम शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्यावतीने सावध पवित्रा घेतला जात आहे. त्यातच लोकांमध्ये ई-पासवरून प्रचंड नाराजी आहे. ई-पास रद्द करावा अशी जोरदार मागणी आहे. पण ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता याबाबत राज्य सरकार फारसे अनुकूल दिसत नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती समोर येत असल्यामुळे यावेळी अनलॉकच्या नियमांमध्येही काय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.