थायलंडच्या डॉक्टरांनी बनवली तंबाखूच्या पानांपासून कोरोना प्रतिबंधक लस!


बँकॉक – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम असून, या संकटातून बाहेर निघण्यासाठी अनेक देशातील संशोधक प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक लस बनवल्याचा दावा केला जाता आहे. त्यातच आता थायलंडमधील संशोधकांनी तंबाखूच्या पानांचा वापर करून कोरोना प्रतिबंधक लस विकसित केल्याचा दावा केला आहे. स्थानिक पातळीवर निर्माण तयार करण्यात आलेल्या या लसीची माकडावर करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी झाल्याचा दावा थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजारावर विख्यात असणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे

याबाबत अधिक माहिती देताना थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी सांगितले की, तंबाखूच्या पानात व्हायरसच्या डीएनएचे एकत्रिकरण करून ही नवीन लस तयार केली जात असून झाडाकडून त्या डीएनएला योग्य तो प्रतिसाद मिळतो आणि एका आठवड्यानंतर प्रथिने तयार होतात, असे बँकॉक पोस्टच्या अहवालात म्हटले आहे. त्यातचबरोबर लस तयार करण्यासाठी त्या प्रथिनांचा अर्क काढून घेण्यात येतो.

उंदीर आणि माकडांवर आत्तापर्यंत या लसीचा वापर करण्यात आला आहे. मनुष्यावर चाचणी ही त्याच्या पुढची पायरी असेल, असे त्यांनी सांगितले आहे. विशिष्ट प्रकारच्या तंबाखूच्या पानांच्या प्रथिनांपासून बनलेली ही लस अगदी औद्योगिक स्तरावरही उत्पादित करणे सोपे आणि स्वस्त आहे. तसेच याच्या पेटंटसंदर्भात कोणतीही समस्या येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे बँकॉक पोस्टने म्हटले आहे.