आम्ही सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावाचा कधीच उल्लेख केला नाही : देवेंद्र फडणवीस


पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सोपवण्यात आल्यापासून या तपासादरम्यान आता दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात भाजपने त्याचबरोबर आमच्या कोणत्याही नेत्याने कधीही आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले नसल्याचे माध्यमांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

भाजपच्या कोणत्याही नेत्याने या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कधीही नाव घेतलेले नाही. आता जी जी माहिती सुशांत सिंहप्रकरणी समोर येत आहे, ती सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. हे खुलासे सीबीआय येईपर्यंत का झाले नाहीत हा एक नक्कीच प्रश्न आहे. याव्यतिरिक्त जे निरनिराळे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचीही उत्तरे देण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.

सुशांतच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु झाल्यानंतर आज जवळपास ४० दिवसांनंतर सीबीआय आली. माध्यमांमधून मला आठ हार्डडिस्क नष्ट करण्यात आल्या किंवा काही पुराव्यांबाबत माहिती पाहायला मिळत आहे. यातून मुंबई पोलिसांवर काय दबाव होता किंवा अडचण होती अथवा राजकीय दबाव होते की त्यांनी याची तपासणी केली नाही असा नक्कीच प्रश्न उद्भवत असल्याचे ते म्हणाले. सीबीआय आता सत्य बाहेर काढेल. पण हे जर आधी बाहेर आले असते तर आपल्याला सत्य लवकर समजले असते. या प्रकरणी नक्की काय घडले कोण यामागचा सुत्रधार कोण आहे हे समजले असते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.