सीतारमण यांनी कोरोनाला म्हटले Act of God; भाजप आमदाराचे मोदी हे दैवी अवतार असल्याचे ट्विट चर्चेत


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशावर ओढावलेले संकट म्हणजे Act of God (देवाची करणी) असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था यंदाही आकुंचन पावणार असल्याचे सांगत राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे कबूल केल्यानंतर देशात यासंदर्भातील सर्चचे प्रमाण वाढल्याचे दिसले. याचसंदर्भातील चर्चा ट्विटर आणि फेसबुकवरही काल सुरु होत्या. पण महाराष्ट्रातील एका भाजप नेत्याचे ट्विटही चांगलेच व्हायरल झाले आहे. त्या भाजप नेत्याने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी हे दैवी अवतार असल्याचा दावा केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांच्या या व्यक्तव्यानंतर Act of God बद्दल सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली. यामध्येच केंद्र सरकार आता थेट देवाला आर्थिक परिस्थितीसाठी दोष देत असल्याची अनेकांनी टीका केली. तर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी केलेल्या ट्विटचा संदर्भ काहींनी दिला. वाघ यांनी या ट्विटमध्ये, भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णुचे अकरावे अवतार असल्याचे म्हटले होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदीतही मोदींनी टॅग करुन हे ट्विट केले होते.

देशातील अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी देव जबाबदार असल्याचे अर्थमंत्री याच ट्विटचा आधार घेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे मोदींना भाजपच्या नेत्यानेच देव म्हटले होते म्हणजेच नक्की जबाबदार कोण असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता सोशल मीडियावर वाघ यांच्या जुन्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहेत. या ट्विटचा संदर्भ देत अनेकांनी मोदींना अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी जबाबदार धरावे का असा प्रश्न विचारला आहे.