आरोग्य मंत्रालयाचा दावा; ‘या’ त्रिसुत्रीमुळे वाढला देशातील रिकव्हरी रेट


नवी दिल्ली – जगावर आढोवलेल्या कोरोना संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत असले तरी या रोगावर यशस्वीरित्या मात करणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशभरातील ३/४(तीन चतुर्थांश) पेक्षा अधिक रुग्णांनी मागील पाच महिन्यांमध्ये कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून, देशात सध्या १/४(एक चतुर्थांश) पेक्षाही कमी अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआयने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तात, देशभरात ३/४(तीन चतुर्थांश) पेक्षा अधिक रुग्णांनी मागील पाच महिन्यात कोरोनावर यशस्वी रित्या मात केली असून, देशात सध्या १/४(एक चतुर्थांश) पेक्षाही कमी अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट (Test-Track-Treat) या त्रिसुत्रीची प्रभावीपणे अमंलबाजवणीमुळे, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) अधिक व मृत्यू दर कमी झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याचा उच्चांक गुरुवारी नोंदविण्यात आला. ७५ हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण २४ तासांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाखांच्याही पुढे पोहचली गेली होती. देशात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे.