नव्या नियमावलीनुसार विमानात आता पुन्हा मिळणार या सेवा

नागरी उड्डाण मंत्रालयाने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीच्या मानक परिचालन प्रक्रियेमध्ये (एसओपी) बदल केले आहेत. आता एअरलाईन्सला विमानात जेवण देण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता प्रवाशांना विमानात आधीपासूनच पॅक असलेले जेवण, स्नॅक्स, पेय पदार्थ दिले जातील. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणात एअरलाईन्स मर्यादित पेय पर्यायसह गरम जेवण देऊ शकतील.

सरकारने डिस्पोजेबल प्लेट, कटलरी आणि सेटअप प्लेटचा वापर करण्यास सांगितले आहे. डिस्पोजेबल ग्लास, बाटली, कॅन आणि कंटेनरमध्येच चहा, कॉफी आणि अन्य पदार्थ दिले जातील. सोबतच प्रत्येक वेळी जेवण आणि पेय देताना क्रू मेंबर्सला नवीन हातमोजे घालावे लागतील.

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये  इन-फ्लाइट मनोरंजनास परवानगी देण्यात आलेली आहे. सरकारने बोर्डिंगच्या आधी एअरलाईन्सला हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की डिस्पोजेबल ईअरफोनचा वापर करावा अन्यथा प्रवाशांसाठी स्वच्छ ईअरफोन देण्यात यावेत. एअरलाईन्सला प्रत्येक उड्डाणांनंतर आता सर्व टचप्वाइंट्सला स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे लागेल. उड्डाणावेळी जे प्रवासी मास्क घालणार नाहीत आणि कोव्हिड-19 एसओपीचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यास सांगितले आहे.

कोव्हिड-19 मुळे सरकारने 25 मार्चपासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उडडाण सेवा बंद केली होती. त्यानंतर 25 मे रोजी स्थानिक उड्डाण सेवा सुरू झाल्यानंतर जेवण, पेय पदार्थ देण्यास व मनोरंजनावर निर्बंध घातले होते.