आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला; एका बबड्याच्या हट्टापायी लाखों विद्यार्थ्यांना त्रास दिला


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी महत्त्वाचा निकाल देत परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, पण परीक्षा होणारच यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. तसेच परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना राज्य बढती देऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला आव्हान देण्यात आले होते. यावरून आता राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारला भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.

राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना एका ‘बबड्या’च्या हट्टापायी नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार, ऐकतो कोण?, सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला, असे म्हणत शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ज्ञांची मते घुडकावली, यूजीसीला जुमानले नाही, मंत्रिमंडळात चर्चा केली नाही, विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले, अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले, यातून काय साध्य केले?,” असा सवालही शेलार यांनी केला.

महाराष्ट्रातील पाडून दाखवा सरकारने स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले आहे. पण विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊ आणि यश नक्कीच तुमच्या वाट्याला येईल, असेही शेलार म्हणाले.