ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण


मुंबई : आपल्या हक्काचे घर घेणाऱ्यांसाठी राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केल्यामुळे आता राज्यात स्वस्तात घरे घेणे सहज सोपे आहे. राज्यात रिअल इस्टेट क्षेत्राची प्रगती कोरोनाच्या संकटामुळे सुस्तावल्याचे चित्र दिसत आहे. पण सरकारने याच क्षेत्राला आता पुन्हा उभारी देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने 5 टक्के असलेली स्टॅम्प ड्युटी ही 2 टक्क्यांवर आणली आहे.

कोरोनाच्या संकट काळात राज्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यातच स्टॅम्प ड्युटी कमी केल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर आणखी ताण येऊ शकतो. पण हा निर्णय रिअल इस्टेट क्षेत्राला पुढे आणण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशात कोरोनाच्या संकटात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असल्यामुळे स्वस्तात घर घेणाऱ्यांसाठीही ही फायद्याची बाब आहे.

राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असून मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे या शहरातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सध्या घर खरेदीकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी सुरू असल्याचे दिसते. महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात स्टॅम्प ड्युटी 1 टक्क्याने कमी करत रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा दिला होता.

अखेर या सगळ्यावर आता उपाय काढत स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. अचानक आलेल्या मंदीमुळे रेडी रेकनर आणि स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे सरकारने यावर सकारात्मक विचार करत निर्णय घेतला आहे. दरम्यान, जीएसटी, विक्री कर आणि व्हॅटनंतर स्टॅम्प ड्युटी यावर सरकारचे महत्त्वाचे आर्थिक धोरण हे अवलंबून आहे. या व्यवहारातून दरवर्षा मोठा पैसा राज्यातील महसुलात जातो. त्यामुळे या क्षेत्रात प्रगती आणणे हे आर्थिकदृष्ट्याही तेवढेच महत्त्वाचे आहे. एकीकडे या निर्णयामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल तर दुसरीकडे नागरिकांना स्वस्त दरात घरे मिळतील.