घटनेतील कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करा; भाजप आमदाराचे थेट मोदींना पत्र


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सीबीआयने मुंबई पोलीसाच्या ताब्यात असलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आपल्या ताब्यात घेतला असून सीबीआय चौकशीदरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान भाजपच्या आमदाराने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधत मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, असी मागणी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

उपलब्ध माहितीच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची परवानगी दिली. पण सुशांत सिंह प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नाही आणि त्यामुळे न्यायावर परिणाम झाला आहे. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूनंतर केलेल्या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. अनेक बाबी समोर येऊनही त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरूनही एक ट्विट केले आहे. तसेच देशाच्या आर्थिक राजधानीतील जनहिताचे प्रकरण असल्यामुळे आपली माफी मागत हस्तक्षेप करत आहे. सध्या चर्चेत असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आणि एफआयआर वैध ठरवला. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत या तपासात मुंबई पोलिसांनी कोणतीही प्रगती केली नसल्याचे देखील भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

सुशांत सिंहच्या मृत्यु प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे परमबीर सिंह हे कोणाला तरी क्लीनचिट देण्यासाठी उत्सूक असल्याचे स्पष्ट होत असल्याचे देखील भातखळकर यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 65 दिवस कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. कोरोना चाचणीविनाच मृतदेहाचे ऑटोस्पाय करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दबाव होता, असे डॉक्टरांनी म्हटल्याचा दावा काही वृत्तात करण्यात आल्याचे म्हणत घटनेतील कलम 311 (2)(ब) आणि (क) चा वापर करुन पंतप्रधान आयपीएस अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात, असे भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यांनी त्यात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केल्याचे म्हटले होते.