सोशल मीडियात भूशी डॅमच्या नावाखाली व्हायरल होत आहे राजस्थानच्या गोवटा डॅमचा व्हिडीओ


देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटातून अद्याप तरी म्हणावी तशी आपली मुक्तता झालेली नाही. त्यातच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत असलेली वाढ देखील चिंता वाढवणारी आहे. त्याचबरोबर सरकारच्या वतीने कायम आपल्या सोशल डिस्टन्सिंग आणि गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आता 5 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. पण राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील काही ठिकाणी बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एरवी गर्दीने गजबजलेल्या भुशी डॅमची मज्जा अनेकजण मिस करत आहे.

त्यातच मागील काही दिवसांपासून सोशल मीडियात लोणावळ्याजवळील भुशी डॅमचे कथित व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये पोलिस पर्यटकांना हटकताना दिसत आहेत. पण नेटकरी जरी हे व्हिडिओ भुशी डॅमचे असल्याचे सांगत असले तरीही ते वास्तवात राजस्थानमधील गोवटा डॅमचे असल्यामुळे सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओसह अन्य कोणत्याही फेक माहितीच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन माझा पेपर आपल्या वाचकांना करत आहे.

मुंबई-पुणे महामार्गाला लगूनच असणार्‍या लोणावळा येथील भुशी डॅमवर ऐरवी पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकजण वीकेंडला मज्जामस्ती अथवा सहलीसाठी या ठिकाणाला आवर्जुन भेट देतात. पण यंदा कोरोना संकटामुळे अशाप्रकारे बाहेर पडायला, वर्षा पर्यटनावर बंदी आहे. त्यातच सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला भुशी डॅमवर वीकेंडला पर्यटकांची गर्दी हा दावा खोटा आहे. मात्र राजस्थान मधील एका वृत्तपत्रकाने तेथील स्थानिक डॅमवर पर्यटकांची असणारी तोबा गर्दी दाखवणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ही गर्दी लोणावळ्यामधील नसून राजस्थानातील आहे. दरम्यान युट्युब वरील एक व्हिडिओ देखील त्याचा दाखला देत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील हा व्हिडिओ लोणावळ्यामधील असल्याचे सांगण्यात आले असेल तर ते पाठवणार्‍याच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या.

आजकाल भावनेपोटी किंवा सामान्यांच्या भावनांसोबत खेळून खोटे व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याचे धंदे वाढले असून यामध्ये अनेकदा आपण आपल्याकडे आलेल्या बातमी अथवा व्हिडीओची सत्यता न पडताळाता ते फॉरवर्ड करत असल्यामुळे असले प्रकार वाढत आहेत.