ट्रम्प सरकारचा अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला


वॉशिंग्टन – मागील काही काळापासून भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध सुधारल्याचे चित्र दिसत आहे. पण असे असले तरी भारतासंदर्भात कठोर पावले उचलत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. अशाप्रकारच्या सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी का दिल्या आहेत याबद्दलचे कारण स्पष्ट केलेले नाही. पण दहशतवाद, एखाद्या प्रदेशात होणारे युद्ध, वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांच्या कालावधीमध्ये अशाप्रकारच्या सूचना या देण्यात येतात.

प्रवासासंदर्भात भारताचे अमेरिकेने रँकिंग चार असल्याचे निश्चित केले आहे. हे सर्वात वाईट रँकिंग असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेने हे रँकिंग देत भारताचा समावेश युद्ध सुरु असणाऱ्या सीरिया, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, ईराण, इराक आणि येमेनसारख्या देशांच्या यादीमध्ये केला आहे.

त्याचबरोबर भारतामध्ये कोरोनाचा वाढता लक्षात घेत त्याच पार्श्वभूमीवर या सूचना अमेरिकेने दिल्याचे सांगितले जात आहे. भारतातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार कोरोनासोबतच भारतामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

महिलांविरोधात वाढती गुन्हेगारी आणि उग्रवादी कारवायांचाही संदर्भ अमेरिकेने जारी केलेल्या या सूचनांमध्ये देण्यात आला आहे. भारत सरकारकडे यासंदर्भातील मागणी इंडियन टुरिझम अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी संघटना (एफएआयटीएच) केली आहे. एफएआयटीएचने अमेरिकेला या प्रवासासंदर्भातील सूचना मागे घेण्यासाठी भारत सरकारने दबाव टाकावा अशी मागणी केल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकेवर दबाव टाकून भारत सरकारने जारी केलेल्या सूचना मागे घ्याव्यात. भारताची जगभरामध्ये नकारात्मक प्रतिमा तयार होणार नाही याबद्दलची काळजी सरकारने घ्यावी, असे एफएआयटीएचने म्हटले आहे. कोरोनाच्या संकटामुळे भारतातील पर्यटन उद्योग आधीच संकटामध्ये आहे. लवकरच भारतातील पर्यटन उद्योग सुरु करण्याचा विचार करत असताना या सूचनांमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही एफएआयटीएचने व्यक्त केली आहे.

पाकिस्तान, सीरिया, येमेन, ईराण आणि इराकसारख्या देशांसोबत २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या या सूचनांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध एवढे चांगले असतानाही अशाप्रकारच्या सूचना अमेरिकेने जारी करणे समजण्याच्या पलिकडे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

अमेरिकन नागरिकांसाठी दक्षिण आशियामधील देशांपैकी भारत हा भटकंतीसाठीचा पहिला पर्याय असतो. मोठ्या आवडीने आणि उत्साहाने अमेरिकन नागरिक भारतात येत असतात. अमेरिकेतून येणारे पर्यटक हे इतर देशांमधील पर्यटकांपेक्षा अधिक काळ देशामध्ये राहतात. सरासरी २९ दिवस भारतात अमेरिकन पर्यटक राहतात तर अन्य देशातील लोक २२ दिवस राहतात, असे संघटेनेने म्हटले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता भारत विमानतळ आणि देशाच्या सीमा बंद करु शकतो अशी शक्यताही अमेरिकेने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने खास करुन जम्मू-काश्मीर आणि भारत पाकिस्तान सीमा भागांमध्ये न जाण्याचा सल्ला आपल्या नागरिकांना दिला आहे.